Wednesday 28 February 2018

अंडा पराठा

वेळ : १० मिनिटे
वाढणी : १ व्यक्ती


साहित्य :
२ वाट्या गव्हाचं पीठ
मीठ
पाणी
तेल
२ अंडी
१ कांदा  बारीक चिरून
१/२ टोमॅटो बारीक चिरून
कोथिंबीर बरीच चिरून
हळद
लाल तिखट
गरम मसाला

कृती :
१. एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ, चिमूटभर मीठ , पाणी, १ चमचा तेल घालून कणिक मळून घ्यावी .
२. मळलेली कणिक १५ मिनिट भिजण्यासाठी ठेवून द्यावी .
३. एका मोठ्या बाउलमध्ये  २ अंडी फोडून घ्या .
४. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा , टोमॅटो, कोथिंबीर , चवीनुसार मीठ,लाल तिखट, हळद, १/२ चमचा गरम मसाला घालून चमच्याने चांगले फेटून घ्यावे.
५. हे मिश्रण बाजूला ठेवून द्या
६. माध्यम आकाराचे कणकीचे गोळे करून नेहमी प्तमाणे त्यापासून चपाती लाटून घ्यावी .
७. गरम पॅनवर  २ थेम्ब तेल टाकून चपाती दोन्ही बाजूनी चांगली भाजून घ्या .
८ गॅस ची आच मंद करा.
९. चपाती पॅनमध्ये असतानाच त्यावर अंड्याचे मिश्रण पसरून घ्या . मिश्रण चपाती भर पसरेल याची काळजी घ्या .
१०. पॅनवर झाकण ठेवून २ मिनिट वाफेवर अंड्याला शिजू द्या .
११.आता पॅन मधील चपाती अंड्याच्या चिकटलेल्या मिश्रणासहित दुसऱ्या बाजूस परतून चांगली भाजून घ्या .
१२. अंड्याचा हा पराठा प्लेट मध्ये काढून घ्या .
१३. पराठा शेंगदाण्याच्या चटणी सोबत सर्व्ह करू शकता . लहान मुलांना हा पराठा असाच रोल करून दिला तरी आवडीने खातात .

~ अमृता ...
  

Tuesday 27 February 2018

मटर पालक

वेळ : ४० मिनिटे
३ जणांसाठी

पालक म्हणजे पौष्टिकचं . मग तो पानात वाढलेला असो व शाळेत आलेला . आणि popeye मुले तर त्याची लोकप्रियता अजूनच वाढलीये .

म्हणून आजची डिश मटर पालक



साहित्य :
२ जुड्या पालक (निवडून साफ केलेला )
३ लसूण पाकळ्या
१ मोठा कांदा  बारीक चिरून
१/२ टोमॅटो बारीक चिरून
दालचिनी
२ हिरव्या मिरच्या / लाल ओली मिरची
१ कप वाफवलेले मटार
तेल
जिरे , हळद
मीठ , साखर

कृती :

१. पालक धुवून त्याची पाने खुडून घ्यावी.
२. एका पातेल्यात पाणी करत ठेवावे. पाणी गरम झाले त्यात पालक घालून झाकण न ठेवता उकळी काढावी.पाणी बाजूला काढून घ्यावे .
३.  पालक थंड झाला त्यात लसूण पाकळ्या, हिरवी मिरची  आणि दालचिनी  घालून मिक्सरवर पाणी न घालता बारीक पेस्ट करून घ्यावी.
४.  पॅनमध्ये २ टेस्पून चमचे तेल गरम करावे
५. त्यात  जिरे बारीक चिरलेला कांदा पारदर्शक होईतोवर परतावा .
६. बारीक चिरलेला टोमॅटो घालून तो नरम होईतोवर, कच्चा वास जाईतोवर परतावा .
७. १/४ टीस्पून हळद खालून परतून घ्यावे .
८. मिक्शर मधून फिरवून घेतलेली पालकची पेस्ट घालून माध्यम आचेवर ५ मिनिट शिजू द्यावे .
९. वाफवलेले मटार घालून परतावे .
१०. मीट आणि साखर चवीनुसार घालावे .
११. पालक ची पेस्ट भांड्याला चिकटण्याची बंद होई तोवर मंद आचेवर शिजवणे.

~ अमृता .. 

ढाबा स्टाईल मसाला / भरली वांगी

वेळ: ३० मिनिटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी

वांग्याची भाजी काय आपण दार आठवड्याला खातो. पण त्या भाजीतही कित्ती प्रकार . कूट घालून केलेली , मसाला वांगी, भरली वांगी , वांग्याचं खळगोट , नुसती तिखट मिठाची.
कशीही केली तरी सगळे खातात . :)

अगदी बाहेर प्रवासाला जरी आपण गेलो तरी ढाब्याच्या जेवणात आवर्जून मसाला वांगीच सांगतो . ढाब्याच्या वांग्याची चवच असते भारी . म्हणून आज ही ढाबा स्टाईल मसाला वांगीची पोस्ट

वाडीची वांगी हा प्रकार ज्यांना माहित आहे त्यांनी या रेसिपीसाठी ती नक्की वापरावीत .





साहित्य :

८ लहान वांगी
मसाल्यासाठी :
१ कांदा उभा चिरून
५ मोठ्या लसूण पाकळ्या
१ इंच आलं
कोथिंबीर
२ चमचे  शेंगदाण्याचा कूट किंवा मूठभर अख्खे शेंगदाणे (टीप क्र ३)
३ मोठे चमचे खोवलेला ताजा नारळ (टीप क्र १)
२ चमचे तीळ
२ टेस्पून चिंचेचा घट्ट कोळ (टीप क्र २)
एक छोटा गुळाचा खडा
१/२ टिस्पून जिरेपूड
१/२ टिस्पून धणेपूड
१ टिस्पून गरम मसाला
१ टिस्पून लाल तिखट
१ काश्मिरी मिरची (लालसर रंग येण्यासाठी)
चवीननुसार मीठ
फोडणीसाठी :
तेल
जिरे
१ कांदा बारीक चिरून
१/४ टिस्पून हळद


कृती :
मसाला
१. मसाल्यासाठी असलेल्या साहित्यापैकी  कांदा ,आले , लसूण, खोवलेला नारळ , तीळ, शेंगदाणे, मिरची  प्रथम पॅनमध्ये कोरडे भाजून घ्यावेत .
२.कांदा पारदर्शक होईस्तोवर परतावे.
३. हे मिश्रण गार होवू द्यावे. थोडे पाणी, कोथिंबीर  घालून एकदम बारीक वाटून पेस्ट तयार करावी.
४. पॅनमध्ये २ चमचे तेल घालून ही मसाला पेस्ट तेल सुटे तोवर भाजून घ्यावी .
५. त्यात गरम मसाला , मीठ ,  जिरे पावडर, धने पावडर , लाल तिखट घालून  मिश्रण एकजीव करावे   .
६. भाजलेला हा मसाला थंड होऊ द्यावा .
७. यापैकी अर्धा मसाला फोडणीसाठी आणि अर्धा वांग्यात भरण्यासाठी पुढीलप्रमाणे वापरावा

वांगी शिजवण्याची कृती
८. वांगी देठासहित वापरावी . देठासहित वांग्याना  एक उभा आणि एक आडवा काप द्यावा . (टीप क्र ६ )
९. त्यात भाजलेला मसाला वांगी पूर्ण भरतील असा भरावा. वांग्यांना वरून तेल पुसून घ्यावे .
१०. एका मोठ्या भांड्यात ३/४ पाणी उकळत ठेवावे
११. पाणी उकळल्यानंतर त्यावर मोदकपात्राची चाळण  ठेवावी .
१२. चाळणीला किंचितसे तेल पसरून घ्यावे .
१३. चाळणीत मसाला भरून तेल लावलेली वांगी ठेवावी
१४. वांगी वाफेवर  १५ मिनिटे उकडून घ्यावी.
१५. वांगी शिजल्यावर गरम पाण्यावरून उतरून घ्यावी (टीप क्र ४)

१६. मोठ्या भांड्यात २ चमचे तेल फोडणीसाठी गरम करावे .
१७. त्यात जिरे आणि बारीक चिरलेला कांदा फोडणीस घालावा .
१८. कांदा पारदर्शक भाजल्यानंतर हळद घालावी.
१९. वांगी भरून उरलेला अर्धा मसाला फोडणीस घालावा .
२०. त्यात चिंचेचा कोळ , आणि गूळ घालावा
२१. एक काप पाणी घालून हा मसाला शिजवून घ्यावा .
२२. मसाला शिजत आल्यावर त्यात उकडलेली वांगी घालावी (टीप क्र ५ )
२३. १ मिनिट मंद आचेवर शिजवत ठेवावे .
२४. मसाल्याला तेल सुटेल . गॅस बंद करावा .


टीप
१. ओल्या नारळा ऐवजी वाळलेला नारळही चालेल .वाळलेल्या खोबऱ्याचा मसाला कमी भाजावा लागतो .
२. घरी चिंच नसेल तर १ चमचा लिंबाचा रस वापरावा .
३. दाण्याचा कूट वापरला तर तो मसाल्यात भाजून घालावा लागत नाही . नुसताच मिक्स करावा
४.वांगी शिजली आहेत हे पाहण्यासाठी त्यात चाकूचे टोक दाबून पाहावे . टोक अलगत आत शिरले पाहिजे
५. वांगी आपण वाफेवर शिजवून घेतली असल्याने पुन्हा पाणी घालून मसाल्यात शिजवण्याची गरज नाही
६. वांगी  देठासहित शिजवल्याने चवीला छान लागतात . देठाला काटे असतील तर ते मसाला भरण्याआधी काळजीपूर्वक काढून घ्यावे

~ अमृता ..

Saturday 24 February 2018

केळ्याचे आईस्क्रिम

१० स्कुप्स आईस्क्रिम 




आईस्क्रिम म्हणजे आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा पदार्थ . काहीही ऑफर करा कुणीही नाही म्हणतचं नाही .

"खाणार का आईस्क्रीम ? " असं कुणी विचारलं तर लगेच डोक्यात चक्र सुरु होतात .
अमूलचं असेल की राजभोग . नॅचरल्सचं त्याहूनही रुचकर लागतं . नाही का हो ?

पण कधीतरी घरीही ट्राय करून पहा की. अन ते ही कोणत्याही रेडिमेड पावडरशिवाय. विदाउट इसेन्स . १००% फ्रुट .
फक्त केळ्याचे आईस्क्रिम 
हो ... आणि या वरच्या सगळ्या ब्रँड्स ना मागे टाकेल अशी चव येते . पहा तर करून एकदा .

साहित्य सांगू का आता ?

साहित्य :
३ ते ४ पूर्ण पिकलेली केळी
१ मोठा चमचा पीनट बटर
१ मोठा चमचा न्युटेला
२ चमचे साखर
१/२ कप दूध
2 वेलदोडे
सजावटीसाठी बदामाचे काप , चेरी अन स्ट्रॉबेरी (आवडीनुसार )

कृती :
१. केळी सोलून घेऊन त्याचे लहान काप करावेत.
२. केळ्याचे काप एका भांड्यात ठेवून ते भांडे फ्रिजर मध्ये किमान ६ तास ठेवून द्यावे .
३. ६ तासांनी पूर्ण फ्रिज झालेली केली बाहेर काढून बाहेरच्या तापमानाला ५ मिनिट ठेवून द्यावीत . बाहेर ठेवल्याने थोडी नरम व्हायला सुरु होतील.
४. अर्धवट नरम केळी एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात घालावी .
५. त्यामध्ये अर्धा कप दूध घालावे. दूध उकळून अथवा कोमट करून घेण्याची गरज नाही .
६. वेलदोडे आणि साखर घालावी .
६. हे मिश्रण २ -३ वेळा मिक्सरमधून फिरवावे.
७. केळ्याचे हे मिश्रण जोवर क्रिम प्रमाणे मऊ होईतोवर मिक्सरमधून फिरवावे. गरज पडल्यास वरून अजून थोडे दूध घालू शकता .  
८. क्रिमी मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढून घ्या .
९ . त्यामध्ये १ चमचा पीनट बटर , १ चमचा न्युटेला   , बदामाचे काप घालून मिक्स करावे.
१०. प्लास्टीकच्या भांड्यात हे मिश्रण ओतून फ्रीजरमध्ये सेट करावे.
११. काही तासांनी मिश्रण घट्ट होईल.आईस्क्रिम खाण्यासाठी तयार आहे .
१२. २ स्कुप आईस्क्रिम  चेरी , स्ट्रॉबेरीचे काप घालून सर्व्ह करावे .

~ अमृता ..

Wednesday 21 February 2018

याला म्हणतात copyright

खरं सांगायचं तर पाककृती लिहिणं किंवा रेसिपी ब्लॉग्स हे काही माझं कधीच ठरलं न्हवतं  आणि कधी वेळही  मिळाला नाही तितकासा . पण हा ब्लॉग लिहायचं खरं  कारण म्हणजे आमचे चिरंजीव .. ६ वर्षांचा चिमुरडा .

शाळेच्या डब्ब्यात २ दिवस सलग चपाती भाजी दिली की  तिसऱ्या दिवशी डब्बा परत .... नखरे .. दुसरं काय

मग नवीन नवीन रुचकर पदार्थांची भटकंती सुरु झाली . ऑनलाईन बरंच काही सापडलं आणि मुख्य म्हणजे आवडलंही . आणि हा प्रवास मला या ब्लॉगपर्यंत घेऊन आला . तुमच्या भेटीसाठी .

हो .... लिहायला सुरु करण्या आधी थोडं या ब्लॉग च्या नावाबद्दल

अहाहा ..... तोंडाला पाणी सुटलं 

एक झणझणीत डिश केली होती काही दिवसांपूर्वी ( त्याची ही पोस्ट येईल लवकरच). अगदी सहज म्हणून तिचा फोटो शेअर केला आणि त्या फोटोला मिळालेली पहिली प्रतिक्रिया
अहाहा ..... तोंडाला पाणी सुटलं. खूप छान अमृता :)

मग ठरवलं ब्लॉगला हेच नाव द्यायचं . बारसं घालणं ही खूप अवघड प्रकार आहे बरं का .... डोक्यात नावांचे ढीग साठतात आणि आपल्याला हव असत नेमकं तेच कुणी दुसऱ्याने अगोदरच उचललेलं असतं  :)

Amruta 's kitchen वगैरे सुचलं पण खुपच धाडसी वाटतं राव .... मला नाही जमायचं

असो .... तर तोंडाच्या पाण्याचा प्रवास आजपासून सुरु
You all are always welcome

आणि हो .... महत्वाचं म्हणजे यातील सगळे पदार्थ मी माझ्या आई कडून शिकलेली आहे .
त्यामुळे सगळं श्रेय आईला :)
तुम्हाला कधी वाटलंच म्हणावसं अहाहा ..... तर आईला नक्की कळवेन मी तुमचा निरोप

कसंय ....   सगळ्या पदार्थात  हाताची चव उतरते आणि माझ्या आई च्या हाताची चव नाही जमली आजवर कुणाला ....
वा ... याला म्हणतात copyright
चोरू म्हटलं तरी चोरता येऊ नये अशी अन्नपूर्णेची ताकद
पानात वाढलेल्या तुपाला दोन बोटांच्या मध्ये घासून बाबा एका सेकांदात ओळखतात हे तूप आईने काढवलं आहे की नाही  

इतका सुंदर स्वयंपाक आणि चव शिकवल्याबद्दल खरंच ... आई मी आयुष्यभर तुझी ऋणी आहे . थँक यू  :)

तिने शिजवलेल्या प्रत्येक घासासाठी
वा आई ... तोंडाला पाणी सुटलं .... अप्रतिम  :)

~ अमृता ..

Popular Posts