Tuesday 27 February 2018

ढाबा स्टाईल मसाला / भरली वांगी

वेळ: ३० मिनिटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी

वांग्याची भाजी काय आपण दार आठवड्याला खातो. पण त्या भाजीतही कित्ती प्रकार . कूट घालून केलेली , मसाला वांगी, भरली वांगी , वांग्याचं खळगोट , नुसती तिखट मिठाची.
कशीही केली तरी सगळे खातात . :)

अगदी बाहेर प्रवासाला जरी आपण गेलो तरी ढाब्याच्या जेवणात आवर्जून मसाला वांगीच सांगतो . ढाब्याच्या वांग्याची चवच असते भारी . म्हणून आज ही ढाबा स्टाईल मसाला वांगीची पोस्ट

वाडीची वांगी हा प्रकार ज्यांना माहित आहे त्यांनी या रेसिपीसाठी ती नक्की वापरावीत .





साहित्य :

८ लहान वांगी
मसाल्यासाठी :
१ कांदा उभा चिरून
५ मोठ्या लसूण पाकळ्या
१ इंच आलं
कोथिंबीर
२ चमचे  शेंगदाण्याचा कूट किंवा मूठभर अख्खे शेंगदाणे (टीप क्र ३)
३ मोठे चमचे खोवलेला ताजा नारळ (टीप क्र १)
२ चमचे तीळ
२ टेस्पून चिंचेचा घट्ट कोळ (टीप क्र २)
एक छोटा गुळाचा खडा
१/२ टिस्पून जिरेपूड
१/२ टिस्पून धणेपूड
१ टिस्पून गरम मसाला
१ टिस्पून लाल तिखट
१ काश्मिरी मिरची (लालसर रंग येण्यासाठी)
चवीननुसार मीठ
फोडणीसाठी :
तेल
जिरे
१ कांदा बारीक चिरून
१/४ टिस्पून हळद


कृती :
मसाला
१. मसाल्यासाठी असलेल्या साहित्यापैकी  कांदा ,आले , लसूण, खोवलेला नारळ , तीळ, शेंगदाणे, मिरची  प्रथम पॅनमध्ये कोरडे भाजून घ्यावेत .
२.कांदा पारदर्शक होईस्तोवर परतावे.
३. हे मिश्रण गार होवू द्यावे. थोडे पाणी, कोथिंबीर  घालून एकदम बारीक वाटून पेस्ट तयार करावी.
४. पॅनमध्ये २ चमचे तेल घालून ही मसाला पेस्ट तेल सुटे तोवर भाजून घ्यावी .
५. त्यात गरम मसाला , मीठ ,  जिरे पावडर, धने पावडर , लाल तिखट घालून  मिश्रण एकजीव करावे   .
६. भाजलेला हा मसाला थंड होऊ द्यावा .
७. यापैकी अर्धा मसाला फोडणीसाठी आणि अर्धा वांग्यात भरण्यासाठी पुढीलप्रमाणे वापरावा

वांगी शिजवण्याची कृती
८. वांगी देठासहित वापरावी . देठासहित वांग्याना  एक उभा आणि एक आडवा काप द्यावा . (टीप क्र ६ )
९. त्यात भाजलेला मसाला वांगी पूर्ण भरतील असा भरावा. वांग्यांना वरून तेल पुसून घ्यावे .
१०. एका मोठ्या भांड्यात ३/४ पाणी उकळत ठेवावे
११. पाणी उकळल्यानंतर त्यावर मोदकपात्राची चाळण  ठेवावी .
१२. चाळणीला किंचितसे तेल पसरून घ्यावे .
१३. चाळणीत मसाला भरून तेल लावलेली वांगी ठेवावी
१४. वांगी वाफेवर  १५ मिनिटे उकडून घ्यावी.
१५. वांगी शिजल्यावर गरम पाण्यावरून उतरून घ्यावी (टीप क्र ४)

१६. मोठ्या भांड्यात २ चमचे तेल फोडणीसाठी गरम करावे .
१७. त्यात जिरे आणि बारीक चिरलेला कांदा फोडणीस घालावा .
१८. कांदा पारदर्शक भाजल्यानंतर हळद घालावी.
१९. वांगी भरून उरलेला अर्धा मसाला फोडणीस घालावा .
२०. त्यात चिंचेचा कोळ , आणि गूळ घालावा
२१. एक काप पाणी घालून हा मसाला शिजवून घ्यावा .
२२. मसाला शिजत आल्यावर त्यात उकडलेली वांगी घालावी (टीप क्र ५ )
२३. १ मिनिट मंद आचेवर शिजवत ठेवावे .
२४. मसाल्याला तेल सुटेल . गॅस बंद करावा .


टीप
१. ओल्या नारळा ऐवजी वाळलेला नारळही चालेल .वाळलेल्या खोबऱ्याचा मसाला कमी भाजावा लागतो .
२. घरी चिंच नसेल तर १ चमचा लिंबाचा रस वापरावा .
३. दाण्याचा कूट वापरला तर तो मसाल्यात भाजून घालावा लागत नाही . नुसताच मिक्स करावा
४.वांगी शिजली आहेत हे पाहण्यासाठी त्यात चाकूचे टोक दाबून पाहावे . टोक अलगत आत शिरले पाहिजे
५. वांगी आपण वाफेवर शिजवून घेतली असल्याने पुन्हा पाणी घालून मसाल्यात शिजवण्याची गरज नाही
६. वांगी  देठासहित शिजवल्याने चवीला छान लागतात . देठाला काटे असतील तर ते मसाला भरण्याआधी काळजीपूर्वक काढून घ्यावे

~ अमृता ..

No comments:

Post a Comment

Popular Posts