Tuesday 27 March 2018

नमकीन चंपाकळी / नमकीन करेला / Namkeen Champakali/ Namkeen Karela

चहासोबत घेण्यास एकदम नमकीन आणि खुसखुशीत . याचा आकार कारल्यासारखा असल्याने याला नमकीन करेला असही म्हणतात 

साहित्य :

१ कप मैदा (मी गव्हाचे पीठ वापरते.)
२ मोठे चमचे बेसन (ऐच्छिक)
जिरा पावडर
धने पावडर
लाल मिरची पावडर
काली मिरी बारीक करून 
हळद(ऐच्छिक)
ओवा 
मीठ
तळण्यासाठी तेल

कृती : 

१. एका भांड्यात मैदा ( किंवा गव्हाचे पीठ) , बेसन आणि जिरा पावडर, धने पावडर,काली मिरी बारीक करून ,हळद(ऐच्छिक), ओवा चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे .
गव्हाचे पीठ वापरल्यास चंपाकळी लालसर होतात . मैद्याने पांढरट होतात .त्यामुळे मैदा वापरल्यास उत्तम . 
२. त्यात २ चमचे गरम तेल घालावे (खुसखुशीत होण्यासाठी )
३. आवश्यक तितके पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्यावे .
४. झाकून १५ मिनिटे भिजत ठेवावे .
५ . मळलेल्या कणकेचे लिंबापेक्षा लहान आकाराचे सामान गोळे करून घ्यावे .
६. पातळसर पान लाटून घ्या.
७ . एक सेंटीमीटर अंतरावर सुरीने उभ्या चिरा करून घ्या . चिरा करताना कडा कापल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी . 
८. फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही बाजू दुमडत रोल करत आणावा . 
९. शेवटची काप आतल्या बाजूस दाबून चिकटवावी.  

१०. वरीलप्रमाणे सर्व करेला / चंपाकळी करून घ्यावे .

११. भांड्यात करेला पूर्ण बुडेल इतके तेल कढवून घ्यावे.
१२. मंद आचेवर सोनेरी रंग येईतोवर तळून घ्यावे . (मोठ्या आचेवर तळल्यास मऊ पडतात आणि आतून कच्चे राहतात . )
१३. टिश्यू पेपरवर काढून घ्यावे .

टीप : आवडत असल्यास गरम असतानाच वरून बारीक मीठ चाट मसाला भुरभुरावा.

~ अमृता ..  

फरसी पुरी - गुजराती स्नॅक्स / Farsi Poori - Gujarati Snacks

साहित्य 
१ कप मैदा (मी गव्हाचे पीठ वापरते.)
२ मोठे चमचे बेसन
जिरा पावडर
धने पावडर
लाल मिरची पावडर
काली मिरी बारीक करून
हळद
ओवा
मीठ
तळण्यासाठी तेल

कृती
१. एका भांड्यात मैदा ( किंवा गव्हाचे पीठ) , बेसन आणि वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे .
गव्हाचे पीठ वापरल्यास पुऱ्या जास्त लालसर होतात . मैद्याने पांढरट होतात .
२. त्यात २ चमचे गरम तेल घालावे (पुऱ्या खुशखुशीत होतात .)
३. आवश्यक तितके पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्यावे .
४. झाकून १५ मिनिटे भिजत ठेवावे .
५ . मळलेल्या कणकेचे लिंबापेक्षा मोठ्या आकाराचे सामान गोळे करून घ्यावे .
६. पातळसर पान लाटून घ्या.
६. पूर्ण पानभर तेल लावून घ्या.
७. लाटले पान  एका बाजूने गोल फिरवत आणून त्याचा रोल करून  घ्या .
८. कणकेचा रोल पुन्हा पोळपाटावर फिरवून गच्च  दाबून बसवणे .
१०. सुरीने त्याचे सामान भागात लहान काप करून घ्या .
११. प्रत्येक काप उभा ठेवून तळहाताने दाबून चपटा करून घ्या .


१२. हा गोळा लाटून पुरीचा आकार द्या . 
१३. काट्या चमच्याने त्याला वरून टोचून घ्या . यामुळे पुरी तळताना फुगणार नाही . 
१४. कडकडीत तापलेल्या तेलात पुरी तळून घ्या . तळताना वरील बाजूने दाब दिल्यास पुरी फुगणार नाही .    

चहासोबत खाण्यास ही पुरी छान लागते . हवाबंद डब्ब्यात ठेवून २० दिवस वापरू शकतो .

~ अमृता ... 

Friday 23 March 2018

कच्छी दाबेली / Dabeli

कच्छी  दाबेली हा  गुजरातमधील लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. अहो नुसता गुजरातचा काय आपलाही आहेच की आवडीचा :) 
गुजरातमधील कच्छ प्रदेशातून जन्माला आल्यामुळे तिचे नाव कच्छी  दाबेली

आता दाबेली इतकी अंगवळणी पडलीये ना की हि गुजराती की स्थायिक ... उत्तर देताना जरा बावचळायला होत   
लादीपावामुळे तो दिसतो बर्गरसारखा पण त्याची चव खूपच वेगळी आहे. त्याची ही आंबट, गोड , तिखट चव रस्त्यावरून चालता चालता आपल्याला भुरळ पडते . 

सगळयांचा लाडका स्ट्रीट फूड आयटम कच्छी दाबेली  

साहित्य :
६ लादी पाव
४  बटाटे उकडून , सोलून
१ कप शेंगदाणे भाजून सोललेले
१ कप बारीक शेव
द्राक्षे , चेरी
१ मोठा कांदा  बारीक चिरून
लाल तिखट
हिंग
गरम मसाला / तयार दाबेली मसाला


कृती :
१. खजूर चिंचेची गोड चटणी तयार करून घ्या . खजूर चिंचेच्या गोड चटणी साठी इथे क्लिक करा .
२. कांदा बारीक कापून त्यात १/२ चमचा चाट मसाला घालून एकजीव करा .
३. भाजके शेंगदाणे फोडून अर्धे करून घ्या .
४. त्यात वरून तिखट  मीठ लावून घ्या .
५. द्राक्षे उभे कापून अर्धे  करून घ्या .
६.  चेरी चे छोटे काप करून घ्या .

दाबेलीच्या आतील स्टफिंग
१. सोलून उकडलेले बटाटे किसणीवर किसून घ्या . 
२.  पॅन  गरम करून त्यात ४ मोठे चमचे खजूर चिंचेची चटणी घाला 
३. १/२ चमचा लाल मिरची पावडर , गरम मसाला , जिरे पावडर, हिंग , हळद , चवीनुसार मीठ घालून एक उकळी येऊ द्या . 
४. त्यात किसलेले बटाटे घालून हलवून घ्या . 
५.  हे स्टफिंग  मंद आचेवर दोनच मिनिटे शिजवून घ्या . 
६. थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून जाडसर पसरून घ्या . 
७. त्यावर कापलेले द्राक्षे , चेरीज , मसाले शेंगदाणे , शेव पसरून दाबून घ्या . 
८. हे स्टफिंग १० मिनिट थंड होऊ द्या . 

दाबेलीची कृती :



१. लादीपाव सुरीने मध्यभागी कापून घ्या . 
२. तयार केलेलं स्टफिंग त्यात चमच्याने भरून घ्या . 
३. त्यावर चिरलेला कांदा, शेव आणि अजून शेंगदाणे  घालून पाव बंद करून हाताने दाबून घ्या . 
४. एका नॉनस्टिक पॅनमध्ये १ चमचा बटर घालून लादीपाव दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या . 
५. भाजलेल्या पावाच्या कापलेल्या तीनही बाजू गॉड चटणीमधे बुडवून बारीक शेवेवरून घोळून घ्या . अशाने शेव वरच्या बाजूसही चिकटेल 
६. वरून पुन्हा थोडा कांदा , शेव आणि शेंगदाणे घालून गरम गरम कच्छी दाबेली सर्व्ह करा . . 

~ अमृता .. 

खजूर चिंचेची गोड चटणी / Tamarind dates chutney

खजूर चिंचेची ही गोड चटणी चाट , दाबेली , भेळ , सामोसा सारख्या चटपटीत पदार्थासोबत असायलाच हवी . 



साहित्य :

१ वाटी पिकलेली चिंच वाळवून
८ ते १० खजूर
१/२ वाटी गूळ
मीठ,
जिरे पावडर, लाल मिरची पावडर  , हळद

कृती :

१ . चिंच , खजूर आणि गूळ वेगवेगळ्या भांड्यांमध्ये पाणी (बोटाच्या १ पेर वर ) घालून ५ तास भिजवून घ्या
२. चिंचेचा हाताने दाबून पूर्ण कोळ काढून गाळून घ्या .
३. भिजलेली खजूर मिक्सरमधून गंध पेस्ट वाटून हे मिश्रण गाळून घ्या .
वरील दोन्ही मिश्रणे बारीक गाळण्याने घालावी म्हणजे चटणी अगदी मऊ होते .
४.    गूळ पाण्यात दाबून विरघळवून घ्या .
५. गॅसवर पातेले घरं करून त्यात चिंचेचा कोळ, खजूर पेस्ट , गुळाचे पाणी , चवीनुसार मीठ , लाल तिखट १/२ चमचा , १/२ चमचा जिरे पावडर आणि १/४ हळद घालून उकळी येऊ द्या .
६. हे पातळ मिश्रण सरबरीत घट्ट होईतोवर उकळत ठेवा . चमच्याने थोड्या थोड्या वेळाने हलवत रहा .
खजुराच्या पेस्टमुळे याला चांगला घट्टपणा येतो .
६.  खजूर चिंचेची ही गोड चटणी थंड होऊ द्या .
७ . खजूर चिंचेची चटणी १५ ते २०  दिवस टिकते . एकदाच जास्त करून फ्रिजमध्ये ठेवून द्यावी . हवी तशी  चाट , दाबेली , भेळ , सामोसा सोबत वापरावी .

~ अमृता .. 

Tuesday 20 March 2018

दोडक्याच्या शिरांची चटणी / Ridgegourd skin chutney

दोडका म्हणजे कुणाचाही लाडका नसलेला असं समीकरणच झालाय जणू . फार कमी लोकांना दोडक्याची भाजी आवडते . आणि भाजी करतेवेळी दोडक्याच्या सोलून काढलेल्या शिरांना नेहमीच फेकून देण्यात येत . पण याच शिरा वापरून आपण खूप चवीष्ट चटणी बनवू शकतो . खरंच .... 

साधी सोप्पी पटकन होणारी दोडक्याच्या शिरांची चटणी 


साहित्य :


दोडक्याच्या शिल्लक राहिलेल्या शिरा (स्वच्छ धुवून घ्याव्या)
मूठभर शेंगदाणे
५ हिरव्या मिरच्या (संख्या तिखटपणाप्रमाणे घ्यावी )
४ लसूण पाकळ्या मध्यम आकार
कोथिंबीर
मीठ आणि १ चमचा लिंबाचा रस




कृती :

१. तापलेल्या पॅन मध्ये २ चमचे तेल घालून दोडक्याच्या शिरा , शेंगदाणे , लसूण , मिरच्या भाजून घ्याव्या . 
२. थंड झाल्यावर सर्व साहित्य एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ आणि १ चमचा लिंबाचा रस घालावा 
३. मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घ्यावे . 
४. चपाती/ पराठा सोबत खाण्यास ही चटणी छान लागते आणि टिकते ही आठवडाभर   

~ अमृता .. 

पंजाबी समोसा - Punjabi Samosa

चिंच खजुराच्या आंबट चटणी सोबत किंवा पुदिन्याच्या हिरव्या चटणीसोबत सामोसा खायला चांगला लागतो 

साहित्य:
४ बटाटे
१ कप वाटाणे  (फ्रोजन किंवा ताजे )

फोडणीसाठी:  
तेल, जिरे, आले   हिंग, मीठ, हळद  
५ ते ६  हिरव्या मिरच्या
१/२ इंच आले
१ चमचा बडीशेप, १ चमचा अखंड धने 
१ चमचा लिंबू रस
चवीपुरते मिठ
तळण्यासाठी तेल

सामोशाच्या वरच्या भागासाठी : 
२ कप मैदा(मी गव्हाचे पीठ वापरते .)
३ चमचे तेल
बारीक केलेले धने 
चवीपुरते मिठ
पाणी, पिठ मळण्यासाठी

कृती :

बटाट्याची भाजी

१. बटाटे कुकरमधून ४ शिट्ट्यांवर उकडून घ्यावे (साधारण जास्त उकडले पाहिजे . अन्यथा भाजी थोडी मॅश करावी लागते .
२. सोलून बारीक चिरून घ्यावे .

३. वाटाणे ताजे असतील तर एकावर उकळून घ्यावे म्हणजे नरम होतील . हिरवी मिरची आणि आले ची पेस्ट करावी .                               
हिरवी मिरची वापरून केलेली भाजी रंगला हळदीमुळे पिवळी होते . लाल भाजी हवी असल्यास हिरवी मिरची ऐवजी लाल मिरची पावडर वापरावी . 
४. फोडणीसाठी ठेवलेले तेल काढले कि त्यात जिरे, आले   मिरची पेस्ट , हिंग, मीठ, हळद घालून परतावे . 
५. बडीशेप आणि धने घालून भाजून घ्यावे . 
६. नंतर वाटाणे आणि चिरलेले बटाटे घालून व्यवस्थित एकजीव करावे. 
७. चवीनुसार मीठ आणि  १ चमचा लिंबू रस घालावे .
(बटाटे जास्त उकडले नसतील तर भाजी किंचित मॅश करून घ्यावी ) 
८. झाकणी ठेवून एक वाफ काढून घ्यावी .    


सामोशाच्या वरच्या आवरणासाठी 
१. एका बाउल मध्ये २ कप मैदा,३ चमचे तेल,१ चमचा बारीक केलेले धने,चवीपुरते मिठ घ्यावे
( मी गव्हाचे पीठ वापरते. गव्हाच्या पीठाने सामोसे लालसर होतात . मैद्याने ते पांढरट रंगाचे राहतात )
२. पाणी घालून कणिक घट्ट मालिन घ्यावी . अर्धा तास मुरण्यास ठेवून द्यावी .
३. मळलेल्या कणकेचे माध्यम आकाराचे समान भाग करून गोळे करून घ्यावे

सामोसा 

१ . कणकेचा एक गोळा पोळपाटावर पातळसर लाटून घ्यावा
२. सुरीने कापून त्याचे अर्धगोल आकारात २ भाग करावे .
३. त्यातील एका अर्धगोलाला न कापलेल्या बाजूला (गोलाकार बाजू ) कापसाच्या बोळ्याने दूध /  पाणी लावून घ्यावे . (सामोसा चिकटण्यास मदत होते . )
४. अर्धवर्तुळाची कापलेली दोन्ही टोके एकत्र करून त्याला कोनसारखा आकार द्यावा . कोन व्यवस्थित सील करून घ्या .
५. त्यात आपण तयार केलेली बटाट्याची भाजी लहान चमच्याने भरून घ्या . भाजी चमच्याने आत दाबावी त्याने ती पोकळ जागेत जाऊन बसेल .
६. वरच्या बाजूने रिकामी राहिलेली कणनेची बाजू एकावर एक चिमटुन सील करून घ्यावी .
७. साधारण सामोसे पूर्ण बुडतील इतके तेल कढवून त्यात सामोसे सोनेरी रंगावर माध्यम आचेवर टाळून घ्यावे

सर्व्ह करताना प्लेटमध्ये २ सामोसे घालून त्याला बोटानी मध्य भागी खळगा करून घ्यावा .
त्यात चिंचेची गॉड चटणी भरावी . वरून बारीक शेव , चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालावी .

~ अमृता .. 

Thursday 15 March 2018

दाल मखनी / Dal Makhani

साहित्य 
१ १/२ वाटी अखंड उडीद (काली दाल), १/२ वाटी राजमा
२ मोठे कांदे ,१ टोमॅटो , कोथिंबीर , आले लसूण पेस्ट
तेल , जिरे, हळद, गरम मसाला , साखर , मीठ , लाल तिखट
जिरे पावडर , धने पावडर
खडा मसाला : लवंग , दालचिनी , तमालपत्र
मिल्क क्रिम / गोडस  दही २ मोठे चमचे , १ चमचा बटर

कृती 
१. उडीद आणि राजमा एकत्र करून स्वच्छ धुवून साधारण ८ तास पाण्यामध्ये भिजवावा .
२. कुकरमध्ये ४ शिट्ट्या करून तो शिजवून घ्यावा .
३. कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून मिक्सरमध्ये त्याची वेगवेगळी पेस्ट करून घ्यावी
४. एका  मोठ्या भांड्यात फोडणीसाठी तेल गरम करावे
५. त्यात १ चमचा जिरे , खडा मसाला घालावा  .
६. जिरे तडतडले की त्यात कांद्याची पेस्ट भाजून घ्यावी
७. ही पूर्ण भाजली कि त्यात टोमॅटो पेस्ट घालून भाजावी
८. टोमॅटोला तेल सुटे तोवर भाजून झाली की आले लसूण पेस्ट १ चमचा घालून मसाला भाजावा
९. त्यात १/२ चमचा हळद , १/२ चमचा धने पावडर , १/२ चमचा जिरे पावडर , १/२ चमचा गरम मसाला १ चमचा लाल तिखट , १/२ चमचा साखर, चवीप्रमाणे मीठ घालून भाजून घ्यावा .
१०. मसाला पूर्ण भाजला की त्यात कुकरमध्ये शिजवलेली डाळ आणि राजमा घालावा . कुकरमध्ये शिजताना घातलेले पाणी डाळीवर उरले असल्यास
ते फेकू नये . मसाला याच पाण्यात शिजवावा . चांगली चव येते . (अन्यथा १/२ कप गरम पाणी घालावे. )
११. हे मिश्रण मंद आचेवर ५ मिनिट शिजू द्या .
१२. त्यात मिल्क क्रिम / गोडस  दही २ मोठे चमचे आणि १ चमचा बटर घालून हलवा .
१३. दाल मखनी मधील पूर्ण पाणी आटवून तिला फार कोरडी करू नये . तिच्या अंगाबरोबर पाणी शिल्लक ठेवावे कारण थंड होईल तशी ती पुन्हा घट्ट होत जाते
१४. गरम गरम दाल मखनी सर्व्ह करताना वरून थोडी बारीक कोथिंबीर चिरून घाला .

~ अमृता ... 

Wednesday 14 March 2018

गाणगापुरी डाळ / Daal

 खरंतर याचं नक्की नाव काय हे मलाही नाही माहीत . शाळेत असताना मी घरच्यांसोबत श्रीक्षेत्र गाणगापूर येथे दर्शनास गेले होते . तिथे पद्धत अशी आहे कि आपण ब्राम्हणाच्या हस्ते नैवेद्य अर्पण  करावा लागतो. आणि तो नैवेद्य सोवळ्याने शिजवावा लागतो . त्यामुळे आम्ही ही एका ब्राम्हणाच्या घरी उतरलो . त्यांनी केलेली हि डाळ ..... ही गाणगापुरात खाल्ली म्हणून त्याच नाव गाणगापुरी डाळ :)

आलं लसूण कांद्याशिवाय एखादा पदार्थ चवदार करता येतो हा त्यादिवशी लागलेला शोध

साहित्य
२ वाट्या तूर डाळ कुकरला शिजवून
१ मोठा गुळाचा खडा किसून
मीठ , चिंच
एक लाल मिरची , तेल , जिरे , मोहरी , हळद

कृती
१. तूरडाळ जास्त पाणी घालून ४ शिट्ट्यांवर कुकरमध्ये शिजवून घ्यावी
२. एका  भांड्यात फोडणीसाठी तेल गरम करावे.  जिरे , मोहरी घालावी.
    वाळलेली लाल मिरची घालावी .
३.  जिरे , मोहरी तडतडली की शिजवलेली डाळ घालावी
४. हळद, गूळ आणि मीठ घालून एकजीव हलवावी . डाळ करताना रवीने घोटू नये . ती बऱ्यापैकी अखंड राहिली पाहीजे .
५. आंबट गोड चवीची हि डाळ करायला सोपी , कमी जिन्नस लागणारी , झटपट होणारी आणि जिभेचे चोचले पुरवणारी आहे . 

~ अमृता ... 

मोकळा झुणका/ कोरडा झुणाक / Mokala Zunaka

मोकळा झुणका हा महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो . कोरडा झुणाक  असेही म्हणतात याला . पाणी न घालता शिजवायचा म्हणून कोरडा आणि शिजल्यावर सुटसुटीत होतो म्हणून मोकळा :)

साहित्य :
२ वाटी चणा डाळ
२ मोठे कांदे बारीक चिरून
४ हिरव्या मिरच्या
कोथिंबीर बारीक चिरून
तेल , जिरे, हळद, मीठ

कृती :
१. २ वाटी चणा डाळ धुवून ६ ते ७ तास पाण्यात भिजत घाला
२. डाळ पूर्ण भिजली की पाण्यामधून उपसून एकावर मिक्सर मधून फिरवून घ्या .
हो एकदाच ..... फार बारीक वाटायची नाहीये . थोडी भरड जाडसरच असली पाहिजे
३. ही वाटलेली डाळ चाळणीला तेल पसरून त्यावर एकावर पसरा.
४. उकळत्या पाण्याच्या भांड्यावर मोदकाप्रमाणे चाळण ठेवून द्या .
५. ही डाळ झाकणी ठेवून वाफेवर किमान १५ मिनिट वाफवून घ्या .
 डाळ शिजली आहे कि नाही हे पाहण्यासाठी त्यात वरून अलगद सूरी घालून  वर काढा . सुरीला डाळ न चिकटता ती स्वच्छ बाहेर आली  तर आपली डाळ शीजलीये असं समजा .
(चलन उपलब्ध नसेल तर कुकरमध्ये ३ शिट्ट्यात ही डाळ वाफेवर शिजते )
६. शिजलेली डाळ थोडा वेळ थंड होण्यास चमच्याने हलवून ठेवा .
७. थंड झाल्यानंतर हाताच्या दोन्ही टाळाव्यात घासून वाटली डाळ मोकळी करून घ्या . जे ने करून गुठळ्या राहणार नाहीत .
८. एका मोठ्या भांड्यात फोडणीसाठी ३ मोठे चमचे तेल घाला . (मोकळ्या झुणक्यासाठी तेल घालताना हात जरा सैल सोडावा . तरच तो मोकळा सुटतो )
९. तापलेल्या तेलामध्ये १ चमचा जिरे , बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेला कांदा परतून घ्या .
१०. कांदा नीट शिजला कि त्यात मोकळी केलेली डाळ घालून हलवून घ्या .
११. चवीनुसार मीठ घाला
१२. मंद आचेवर साधारण ५ मिनिटे झाकणी लावून शिजू द्या
१३. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करा . कोथिंबीर नेहमी शेवटी घालावी . तरच तिचा हिरवा रंग टिकून राहतो अन्यथा ती काळपट शिजते .
१४. हा मोकळा झुणका नुसता खायलाही छान लागतो .

~ अमृता ... 

Thursday 8 March 2018

दही बुत्ती / Dahi Butti / Curd rice

खूप वेळा घर शिळा भात उरतो आणि मग त्याचं नेमकं काय करायचं हा प्रश्न पडतो . दहीबुत्ती हा एकदम छान उपाय आहे शिळ्या भातासाठी . खरतर बरेच लोकं  यासाठी ताजा भात वापरतात पण भात जर कालचा असेल तर हा छान होतो आणि शिळेपणाही रुचकर होतो :)

साहित्य
२ वाट्या भात
१ वाटी दही
१/२ वाटी थंड दूध
तेल , जिरे , लसूण पाकळ्या , वाळलेली लाल मिरची, कढीपत्ता,  मीठ , साखर ,
सजावटीसाठी किसलेले गाजर

 कृती
१. भात जर ताजा वापरणार असाल तर तो थोडावेळ ताटात पसरून थंड करून घ्यावा .
२. भातात १/२ कप थंड दूध एकत्र करावे
३. फोडणीसाठी तेल गरम करून घ्यावे.
४. त्यात जिरे , बारीक चिरलेला लसूण ,  वाळलेली लाल मिरची, कढीपत्ता घालावा .
५. फोडणी गॅसवरून उतरवून घ्यावी व त्यात दही घालून चांगले हलवून घ्यावे
६. चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालावी .
७. एकत्र केलेला दूध भात घालावा व मिश्रण गॅसवर २ मिनिट गरम करून घ्यावे
८. सर्व्ह करताना वरून किसलेले गाजर घालावे .

~ अमृता ...   

व्हेजिटेबल पुरी / Vegetable Poori


साहित्य 
२ वाट्या गव्हाचे पीठ , १ मोठा चमचा रवा
कणिकेसाठी पाणी , मीठ , जिरे पावडर , धने पावडर , लाल मिरची पावडर
२ बटाटे उकडून( मध्यम आकार  )
१ गाजर उकडून
आले लसूण पेस्ट

कृती :

१. २ उकडलेले बटाटे, १ उकडलेले गाजर  किसणीने किसून घ्यावे .
मॅश केल्यास गुठळ्या राहू शकतात आणि पुऱ्या फुटतात म्हणून हे किसणीने किसून घ्यावे .
२. कणिकेसाठी  २ वाट्या गव्हाचे पीठ , १ मोठा चमचा रवा ,मीठ , जिरे पावडर , धने पावडर , लाल मिरची पावडर  एकत्र करावे .
रवा घातल्यास पुऱ्या खुसखुशीत होतात .
३. त्यात किसलेले मिश्रण घालावे आणि कणिक एकजीव करावी
४. गरज पडल्यास थोडे पाणी घालून घट्ट मळून घ्यावी
५. कणिक १/२ तास भिजत ठेवावी
६. नेहमीप्रमाणे पुऱ्या लाटून तेलात टाळून घ्याव्या
७. लसणाच्या किंवा शेंगदाणा चटणीसोबत छान लागतात . लहान मुलांना लपवून भाजी खाऊ घालण्याच्या यशस्वी प्रयोग :)

~ अमृता ..

ग्रीन पिझ मसाला / Green Peas Masala


साहित्य
१ मोठा कांदा पेस्ट
१ टोमॅटो पेस्ट
१ चमचा आले लसूण पेस्ट
२ चमचे खवा
१ चमचा दही
लाल मिरची पावडर , मीठ,हळद , गरम मसाला
६ ते ७ काजू
१ मोठा  कप वाफवलेले मटार दाणे (वाटाणे )
पाणी
जिरे

कृती
१. १ मोठा कांदा घेऊन मिक्सरमध्ये पेस्ट करावी . १ टोमॅटोची पेस्ट करावी . ६ ते ७ काजू ची पाणी घालून पेस्ट करावी
२. कढईत तेल  गरम करावे . त्यात फोडणीस जिरे घालावे .
३. कांदा पेस्ट घालून भाजून घ्यावी . कांदा भाजला कि टोमॅटोपेस्ट , हळद घालावी व मिश्रण तेल सुटे तोवर भाजावे
४. १ चमचा आले लसूण पेस्ट घालावी व परतून घ्यावी
५. वरील मिश्रणात काजूची पेस्ट घालावी. जास्त वेळ काजू पेस्ट भाजू नये . भांड्याला चिकटून करपते
६. त्यात लाल मिरची पावडर , मीठ,  गरम मसाला घालून परतून घ्यावे
७. एक कप पाणी घालून उकळी आणावी .
८.  यानंतर घातलेला खवा या भाजीला वेगळी चव आणतो . (खवा उपलब्ध नसेल तर २ मोठे पेढेही चालतात )
९. मसाला चांगला शिजवून घ्यावा . आणि मग २ कप वाफवलेले मटार घालून २ मिनिट झाकून ठेवावे
१०. भाजी पूर्ण शिजत अली की १ चमचा दही घालावे . दही फारसे आंबट नको .
११. ही भाजी मसाल्यासहीत असल्याने चपाती व भात दोन्ही सोबत सर्व्ह करू शकता .

~ अमृता ... 

Wednesday 7 March 2018

कटोरी चाट / Katori Chat

या चाट ला कटोरी चाट म्हणण्याचं कारण म्हणजे त्यातील कटोरी च्या आकारातील पुऱ्या . आणि हेचं जरा कलाकुसरीचे काम आहे . नेहमीच्या पुऱ्यापेक्षा तळण्याची पद्धत जरा वेगळी आहे . त्याची कृती मी फोटोसहित दिली आहे . म्हणजे कशा केल्या असतील की तयार मिळतात अशी शंका नको :)


साहित्य 
पुरीसाठी
१ वाटी गव्हाचे पीठ ( मैदा वापरला तरी चालेल )
१ टीस्पून गरम मसाला , लाल मिरची पावडर
१/२ टीस्पून मीठ , हळद
१ स्पून तेल

चाटसाठी 
१ मोठा कांदा बारीक चिरून
१ टोमॅटो बारीक चिरून
२ बटाटे उकडून मॅश केलेले
१ वाटी बारीक शेव
१ वाटी फेटलेले दही
गोड चटणीसाठी चिंच , खजूर आणि गूळ

कटोरी पुरीची कृती
१. एका भांड्यात १ वाटी गव्हाचे पीठ घेऊन त्यात गरम मसाला, लाल मिरची पावडर , मीठ, हळद घालून पीठ पाण्याने नेहमी प्रमाणे मळून घ्यावे .
२. साधारण १/२ तास झाकून मुरण्यास ठेवावे .
पुऱ्या लाटायला घेण्याआधी टाळण्यासाठी तेल गरम करत ठेवावे .
३. पिठाचा लहान गोळा घेऊन अगदी पातळ लाटावा
४. त्याला काट्या चमच्याने भोके पाडावी . अशी भोके पडल्याने पुरी तळताना फुगणार नाही
५. वाटीने किंवा पेल्याने लाटलेल्या पानावर गोलाकार पुरीसाठी कापून घ्यावे .


६. ही गोल पुरी लहान वाटीच्या आतल्या बाजूला दाबून बसवावी .
७. गरम झालेल्या तेलात ही पुरी वाटीसहीत टाळण्यास सोडावी. तळताना आतील बाजूने चमच्याने दाबावी . त्यामुळे पुरीला वाटीचा कटोरीसारखा आकार येईल .
८. पूर्ण तेल निथळून वाटी पुरीसहित बाहेर काढावी . तळल्यामुळे कटोरी पुरी वाटीपासून वेगळी होते .

चिंच गुळाची चटणी
१. १ मूठ चिंच आणि ६ खाजं २ तास गरम पाण्यात भिजत ठेवावे .
२. भिजल्यानंतर ते मिक्सरमधून वाटून घ्यावे
३. गाळणीने घालून घ्यावे . त्यामुळे चिंचेचा राहिलेला भाग बाजूला काढता येईल
४. गाळलेले हे मिश्रण हिंग , लाल मिरची पावडर, मीठ, १ मोठा गुळाचा खडा ,जिरे पावडर घालून ५ मिनिट पुकाळून घ्यावे
५. चिंच गुळाची ही चटणी जरा घट्टच व्हायला हवी .

चाटची कृती
१. ५ ते ६ कटोरी पुऱ्या प्लेटमध्ये मांडून घ्याव्या .
२. त्यात मॅश केलेला बटाटा भरावा
३. त्यावरून बारीक चिरलेला कांदा  आणि टोमॅटो घालावा
४. प्रत्येक पुरीमध्ये एक मोठा चमचा चिंच गुळाची चटणी भरावी
५.  वरून १/२ चमचा दही घालावे . भरपूर शेव घालावी . आणि अजून थोडी चटणी वरून पसरवावी .
६. चटपटीत कटोरी चाट दिसायला जितका छान दिसतो त्यापेक्षाही चव छान लागले

~ अमृता ... 

Tuesday 6 March 2018

मसाला पाव / Masala Pav


वाढणी  १ व्यक्ती
वेळ १५ मिनिटे



साहित्य 
२ बनपाव ( पाव भाजीचे ब्रेड )
१ कांदा बारीक चिरून
१/२ टोमॅटो ची प्युरी
 १/२ शिमला मिरची बारीक चिरून
लाल तिखट , मीठ , पाव भाजी मसाला
शेव
बटर

कृती 
१. प्रथम एका पॅनमध्ये १ चमचा बटर गरम करून घ्यावे .
२. त्यात कापलेला कांदा अर्धा घालून परतावा .
३.कांदा  भाजला कि टोमॅटो प्युरी घालून भाजून घ्यावी
४. शिमला मिरची घालून चांगला परतून घ्यावी
५. या मिश्रणात मीठ, लाल तिखट , पाव भाजी मसाला घालावा . ब्रेड च्या आत भरण्यास हे मिश्रण वापरावे .
६. भाजी नववलेल्या पण मध्येच  एका बाजूस बटर घालून ब्रेड मधून कापून भाजून घ्यावा .
याच पॅनमध्ये भाजल्याने ब्रेड ला पॅनचा मसाला लागून राहील
७. भाजलेल्या ब्रेड मध्ये भाजी भरून घ्यावी. ब्रेड ला वरूनही भाजी लावून घ्यावी
८. सर्व्ह  करताना वरून कच्चा कांदा आणि भरपूर शेव घालावी .

~ अमृता ... 

कॉर्न चाट / Corn Chat

वाढणी  २ व्यक्तींसाठी
वेळ १० मिनिटे


साहित्य 

२ स्वीट कॉर्न उकडून दाणे काढून
१ टीस्पून लाल मिरची पावडर
१ चमचा लिंबू रस
१ टीस्पून चाट मसाला
१/२ टीस्पून जिरा पावडर
१ कांदा बारीक चिरून
१ टोमॅटो बरीच चिरून
कोथिंबीर बारीक चिरून
मीठ , बटर
बारीक शेव , बुंदी

कृती 
१. प्रथम उकडून घेतलेल्या कॉर्न चे दाणे काढून घ्यावे
२. एका मोठ्या पण मध्ये १/२ चमचा बटर गरम करून त्यावर हे दाणे भाजून घ्यावे .
३. त्यात छान मसाला , लाल तिखट', जिरे पावडर , १ चमचा लिंबू रस , मीठ , बुंदी , कांदा , टोमॅटो , कोथिंबीर घालून एकत्र करावी
४. सर्व्ह  करताना वरून भरपूर शेव घालावी

~ अमृता ... 

Monday 5 March 2018

अननसाचा शिरा / Pineapple Sheera

वाढणी  ४ जणांसाठी
वेळ २० मिनिटे



साहित्य:
२ वाट्या रवा
१ वाटी साजूक तूप
१ १/ २ वाटी पाणी
१/२ वाटी साखर
अननसाचे काप १ १/२ वाटी
वेलची
बदामाचे काप

कृती
१. १ अननसाचे काप मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट करून घ्यावी
२. उरलेले अर्धी वाटी काप एकदम बारीक चिरून घ्यावे
३. पॅनमध्ये रवा  चांगला भाजून घ्यावा .
४. एका भांड्यामधे दीड  वाटी पाणी गरम करून त्यात अननसाचे काप शिजत ठेवावे
५ दीड वाटी पाण्याचे आतून १ वाटी झाले कि गॅस बंद करावा अननसाचे काप नरम होतील .
६. एका मोठ्या भांड्यात २ मोठे चमचे साजूक तूप घालून भाजलेला रवा एकजीव करून घ्यावा .
७. त्यात अननसाची पेस्ट (साधारण १ वाटी) घालून हलवून घ्यावे
८. अननसाचे काप उकळलेले घरं पाणी ( साधारण १ वाटी ) पॅनमध्ये घालून रवा शिजवून घ्यावा
गरज पडल्यास अजून खाडे गरम पाणी वापरू शकता .
९. रवा उरण शिजला कि मग अर्धी वाटी साखर आणि २ चिमट वेलची पूड घालून मिक्स करावी
१०. १ मिनिट शिरा झाकून मंद आचेवर शिजवावा
११. हा  शिरा वर बदामाचे काप घालून गरम गरम सर्व्ह करावा

टीप 
१. जितकी वाटी रवा असेल साधारण तितके पाणी घातले कि शिरा चांगला होतो
इथे २ कप रव्यासाठी १+१ म्हणजे १ वाटी गरम पाणी आणि १ वाटी अननस पेस्ट वापरली आहे .
सध्या शिर्यासाठी २ वाटी गरम पाणी वापरा

२.   अननसाच्या शिऱ्यामध्ये थोडासा खायचा पिवळा रंग आणि केशर वापरले तर रंग उत्तम येतो

~ अमृता ... 

Friday 2 March 2018

अंडाकरी, Egg curry

साहित्य :

६ अंडी
२ मोठे कांदे
तीळ भाजून
वाळलेले खोबरे १/२ कप
कोथिंबीर
१ इंच आले , ४ लसूण पाकळ्या
कोथिंबीर
मीठ , लाल तिखट , गरम मसाला , हळद

कृती :


१. कुकरच्या भांड्यात पाणी घालून ३ शिट्ट्यांवर अंडी उकडून घ्यावी .
भांड्यातही उकडू शकता .
२. अंडी थंड झाली कि त्याची टरफले काढून सोलून घ्यावी
३. सोललेली अंडी गरम तव्यावर थोडा वेळ भाजून घ्यावी .

४. अंडी भाजताना त्यावर चिमुटभर हळद , मीठ आणि लाल तिखट घालावे .
५. अंडी तव्यावर भाजल्याने अंड्याच्या पांढऱ्या भागालाही चव येते .

मसाला :
१. १ मोठा कांदा चिरून, भाजून घ्या . तीळ भाजून घ्या .
२.  हा कांदा , तीळ , लसूण , आले , कोथिंबीर , वाळलेले खोबऱ्याचे काप काढून घ्या
३. मिक्सरमधून १/२ कप पाणी घालून मिश्रण एकदम बारीक करून घ्या.
४. हा मसाला गंध पेस्ट असावा .



अंडा करी कृती :
१. एका मोठ्या भांड्यात तेल गरम करा .
२. त्यात जिऱ्याची फोडणी घाला
५. जिरे तडतडले बारीक चिरलेला एक कांदा पारदर्शक होई तोवर भाजून घ्या .हळद घाला
६. वरील मसाला पेस्ट घालून २ मिनिट चांगली भाजून घ्या .
७. त्यात  लाल तिखट पावडर , मीठ , गरम मसाला घालून १ अर्धा मिनिट परतवू
न घ्या .
९. १ पेला पाणी घालून हाय फ्लेम वॉर एक उकळी आणा .
१०. झाकणी लावून हा मसाला ५ मिनिट बारीक गॅसवर शिजवून घ्या 
११. मसाला शिजत आला की तव्यावर भाजलेली अंडी त्यामध्ये घालून एक मिनिटनंतर गॅस बंद करा .  
ही अंडाकरी  चपाती व भात दोम्हीसोबत खाता येते . 

~ अमृता ... 

Thursday 1 March 2018

तेलावरची पुरण पोळी

होळी रे होळी .... पुरणाची पोळी

होळीनिमित्तची आजची खास पोस्ट .... तेलावरची पुरण पोळी
माझी आई नेहमी म्हणते , ज्या  बाईला तेलावरची पुरणपोळी करता आली ती खरी सुगरण . पिठावरची काय कोणालाही लाटता येते . आणि हो ... हे १००% खरं आहे . कारण तेलावरची पोळी लाटताना हात एकतर खूप नाजूक हलवावा लागतो आणि दुसरं म्हणजे जराशी घाई केली कि पोळी फुटलीच म्हणून समजा .

थोडी मोठी वाटेल वाचताना पण जमतील तितके सगळे बारकावे लिहिले आहेत . करताना सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक अमलात आणा .


१०  आकाराच्या  मध्यम पोळ्या
वेळ: २0 मिनिटे (पुरण आणि पीठ तयार असल्यास)


साहित्य 
१ वाटी हरभरा डाळ (चणा डाळ )
१ वाटी गूळ किसून किंवा बारीक चिरून 
२ वाट्या गव्हाचे पीठ 
तेल 
मीठ
पाणी 
वेलदोडे 
बडीशेप 


पुरणाची कृती 





१. हरभरा डाळ स्वच्छ धुवून एका मोठ्या भांड्यात दुपट्ट पाणी घालून शिजत ठेवावी 
२. अर्ध्या तासात डाळ पूर्ण शिजते . बोटांवर डाळ दाबून पाहावी . 
३. शिजलेल्या डाळीचे पाणी दुसऱ्या भांड्यात ओतून घ्यावे . 
४. पाणी बाजूला केलेल्या शिजलेल्या कोरड्या डाळीत किसलेला गूळ , बडीशेप आणि वेलदोडे पूड एकत्र करावी 
५ . हे मिश्रण १० मिनिट एकजीव होई तोवर शिजवावे. 
६. त्याचा भांड्यात घट्टसर गोळा तयार होईल . 
७. मिश्रण थंड आल्यावर पुरण यंत्रातून / मिक्सरमधून पुरण वाटून घ्यावे . 


टीप : पुराणात गूळ  जास्त झाला तर पोळ्या कडक होतात .   

कणकेची कृती 

१. २ वाट्या गव्हाचे पीठ , ३ चीनचे तेल , मीठ घालून कणिक मळून घ्यावी . 
२. या पोळीसाठी कणिक अगदी सैलसर आणि मऊ मळावी . 
३. यासाठी हात ओला करून करून कणिक मुठीने तींबावी. 
४, झाकण ठेवून १ तास भिजण्यास ठेवावी . 

पोळीची कृती ;






पोळी लाटायला सुरु करण्या आधी चालू गॅसवर तवा  पालथा घालून गरम होऊ द्यावा . 
१. कणकेचा मध्यम आकाराचा गोळा घेऊन पोळपाटावर २ चमचे तेल घालून एकदा उभा आणि एकदा आडवा लाटून लहान पुरीचा आकार करावा . .
२. पुरणाचा  कणकेपेक्षा साधारण मोठा गोळा घेऊन लाटलेल्या कणकेमध्ये घालून गोळा बंद करून घ्यावा . 
३. पळपाटावर पुन्हा १ चमचा तेल घालून पोळी लाटून घ्यावी 
४ . पोळी लाटताना अजिबात उचलू नये . गरज पडल्यास पोळपाट फिरवावा. लाटणे एकाच दिशेने  ( खाली किंवा वर ) फिरवावे. अन्यथा पोळी फुटते . 
५. लाटलेली पोळी लाटण्याला गुंडाळून अलगद उचलावी 
६. पालथ्या गरम तव्यावर पोळी लाटण्यानेच टाकावी 
७ . दोन्ही बाजूस खरपूस भाजून घ्यावी 
८ . तूप घालून गरम गरम वाढावी . थंड पोळ्या दूधाबरोबर/ गुळवणी सोबत छान लागतात.

गुलवणी कृती 
१. एका पातेल्यात १ पेला पाणी गरम करण्यास ठेवा . 
२. त्यात २ मोठे गुळाचे खडे टाका 
३. एक उकळी येऊन गुल विरघळेल . मिश्रण थंड होऊ द्या . 

४. हि गुळवणी थोडंसं  दूध मिक्स करून पोळी सोबत खायला द्यावी 

~ अमृता ..
   

Popular Posts