Sunday, 6 May 2018

चिकन बिर्याणी / Chicken biryani


भारताबाहेरही भारताची सगळ्यात आवडीने खाल्ली जाणारी डिश म्हणजे चिकन बिर्याणी .


चिकन बिर्याणी करण्याच्या २ पद्धती आहेत
१. पक्की चिकन बिर्याणी
यात चिकन वेगळे शिजवून घेतले जाते आणि त्याचे भातासोबत थर लावले जातात .
यमाचे चिकन कच्चे राहण्याची भीती नसते . वेळ कमी लागतो .

२. कच्ची चिकन बिर्याणी 
यामध्ये मॅरीनेट केलेले चिकन भांड्याच्या तळाशी पसरून त्यावर अर्धवट शिजलेला भात थर लावून , सील करून मंद आचेवर १ तास शिजवावी लागते .

ही रेसिपी पक्की चिकन बिर्याणीची आहे ज्यात चिकन वेगळे शिजवून मग थर लावून घेतले आहेत .

हॉटेल सारखी चिकन बिर्याणी बनवायला खूप सोपी आहे पण जरा वेळखाऊ .... कमीत कमी २ तास बिर्याणी बनवण्यासाठी आणि आदल्या रात्रीचा तयारीचा १/२ तास .... पण एकदा १ घास पोटात गेला की मग ही मेहनत कामी आली असं वाटतं .

बिर्याणीमध्ये लवंग , दालचिनी सारखेमसाले पूड करून वापरावे . कारण त्याची पूड केल्याने एकतर ते जास्त स्वाद देतात आणि कमी प्रमाणात लागतात .   



साहीत्य :

मसाल्यासाठी : 

१ कांदा कापून
५ हिरव्या मिरच्या
२ लवंग
१ इंच दालचिनी
१ तमालपत्र
३ वेलदोडे
६ लसणाच्या पाकळ्या
२ इंच आले
पुदिना कापून
कोथिंबीर कापून
हिरव्या मिरच्यांची उभे काप
१ चमचा  गरम मसाला , धने पावडर , जिरे पावडर ,
मीठ
हळद ,
२ चमचा  लाल मिरची पावडर ,
१ मोठा बाऊल दही
१ लिंबाचा रस

चिकन १/२ किलो
बिर्याणीचा तांदूळ १/२ किलो
जिरे ,
तेल
तळलेल्या कांद्यासाठी  ७ ते ८ मोठे कांदे

कृती :

चिकन मॅरीनेट
१. साहित्यामध्ये दिलेला खडा मसाला (लवंग, दालचिनी , तमालपत्र , वेलदोडे ), १ मोठा कापलेला कांदा , लसूण ,आले , ५ हिरव्या मिरच्या , १/२ लिंबाचा रस एकत्र घरून घ्यावे . 
२.  मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घ्या . 
३. एका मोठ्या भांड्यात चिकन स्वच्छ धुवून , आवश्यक त्या आकारात काप करून घ्या . 
४. त्यामध्ये वरील पेस्ट घाला. 
५. १ मोठा बाऊल दही घाला . ४  चमचे कच्चे तेल घाला . 
६. चवीनुसार मीठ , प्रत्येकी १ चमचा गरम मसाला, धने पावडर , जिरे पावडर , १/२ चमचा हळद, २ चमचे लाल मिरची पावडर घाला .  
७. बारीक कापलेली पुदिन्याची पाने , बारीक कापलेली  कोथिंबीर , उभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या घाला . (पुदिना आणि कोथिंबीरच्या माध्यम आकाराच्या पेंडीपैकी साधारण अर्धी पेंडी मॅरीनेट करताना वापरावी . )
८. मिश्रण एकजीव करून पूर्ण १ रात्र मॅरीनेट होण्यास फ्रिजमध्ये ठेवून द्या. 

चिकन शिजताना त्यामध्ये पाणी घालण्याची अजिबात गरज नाही . नुसत्या मसाल्याच्या सुटलेल्या पाण्यावर पूर्ण चिकन शिजून निघते . 

१. पूर्ण १ रात्र चिकन मॅरीनेट केल्यामुळे सगळ्या मसाल्याची चव चिकनमध्ये उतरते . 
२.  मॅरीनेट केलेलं चिकन सकाळी फ्रिजमधून बाहेर काढून १/२ तास ठेवून द्या . 
३. जाड बुडाच्या भांड्यात / बिर्याणीच्या पॉटमध्ये हे मिश्रण घाला . 
४. हे चिकन १० मिनिट मोठ्या आचेवर शिजू द्या    . 
५. आच मंद करून साधारण १/२ तास त्याला शिजवा . 
६. शिजताना मध्ये मध्ये हलवत राहा . त्यामुळे सगळ्या बाजूने छान शिजेल . 
८. चिकन शिजत आले की त्यात तळलेला कांदा (३ ते ४ माध्यम आकाराचे कांदे ) घालून अजून ५ मिनिट शिजवून घ्या .

बिर्याणी साठी लागणाऱ्या भाताच्या रेसिपीसाठी इथे क्लिक करा . 




चिकन बिर्याणीचे थर लावण्याची पद्धत :

१. जाड बुडाच्या गरम गरम  मोठ्या भांड्याला तळाला १ चमचा बटर लावून घ्या .

२. त्यावर भाताचा एक थर पसरून घ्या .

३. त्यावर शिजवलेल्या चिकनचा एक थर पसरा .








४. त्यावर तळलेला कांदा आणि बारीक चिरलेला पुदीना पसार .


५.  त्यावर पुन्हा भाताचा एक थर  लावा .

६. भाताच्या आणि चिकनच्या प्रमाणानुसार या क्रमाने थर लावत जा .




७. सगळ्यात वरच्या भाताच्या थरावर तळलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्या .
८. भांडे सील करून  तव्यावर १० मिनिटे मंद आचेवर  गरम होऊ द्या .
९. सर्व्ह करताना बिर्याणी उभी वरून खालीपर्यंत काढावी म्हणजे सगळे थर एकावेळेस येतात . आडवी काढू नये .




~ अमृता .. 

No comments:

Post a Comment

Popular Posts