Sunday, 10 June 2018

तांदळाच्या पिठाच्या उकडीच्या भाकरी / Supersoft rice flour bhakari / bread

घरातले सगळे आपापल्या कामात मग्न असतात आणि अशावेळी एकदमच स्वयंपाक खोलीतून धाप धाप असा आवाज यायला सुरु होतो .आणि त्यासोबत बांगड्याचा किणकिणाट . 
 ज्यांनी भाकरीची चव चकलीये त्याच्या लगेच लक्षात येत . 
आई भाकरी थापतेय 

भाकरी म्हणजे एक कला आहे जी आईकडून लेकीला वारसा हक्काने मिळते . मलाही भाकऱ्या शिकवायला माझ्या आईने कष्ट घेतलेच की . 


परातभर पसरलेलं ते कोरडं पीठ , त्यावर तिने अलगद हाताने फिरवलेलॆ गोळा मध्यभागी जाऊन बसतो . आणि मग माझी आई त्या धाप धाप आवाजाच्या लयीत गोल गोळ्याची पातळसर परातभर मावेल अशी भाकरी थापते . 

भाकरी थापायलाही खूप सवय असावी लागते बरं का . इतक्या सहज सहजी जमणार काम न्हवे ते .हात फक्त डावीकडून उजवीकडे फिरवायचा . फक्त हातांसोबत भाकरीही फिरली पाहिजे परातीत . 
पिठात एकदा हात घालून बघाच हो नक्की मग लक्षात येईल ... आई नेमकं काय दिव्य करत असेल . 

खरी कसोटी तर याच्या पुठे आहे राव 
थापलेली  भाकरी परातीतून उचलून तव्यात टाकायची कशी ?????
याच कौशल्य शिकवायला शेजारी आईचं उभी असली पाहिजे . 

हो आणि तव्यात ती फुगलीही पाहिजे ... ट ट ट ....म    
हात भाजू न देता तितक्याच चलाखीने ज्योतीवरून फिरवत आली  की मग काम फत्ते 

उगाच म्हटलंय होय .... आधी हाताला चटके मग मिळते भाकर  

भारतातील राहू द्या पण कमीत कमी महाराष्ट्रातील तरी प्रत्येक गृहिणीला भाकरी थापता आलीच पाहिजे . 
या मटण , चिकन आणि माश्याच्या कालवनांसोबत भाकरी खाण्यात जी मजा आहे ती चपातीमध्ये नाही हो 
काहीही म्हणा .. आणि पटलं तर शिकून घ्या भाकऱ्या :)


साहित्य :

१ कप तांदळाचे पीठ
पाणी
२ चमचे तेल

भाकरीची उकड शिजवण्याकरिता तांदळाचे पीठ आणि पाणी समप्रमाणात घ्यावे . इथे १ कप पिठासाठी १ कप पाणी वापरावे  





कृती :

तांदळाच्या पिठाची उकड :

१. तांदळाचे पीठ आणि पाणी दोन वेगळ्या भांड्यात समप्रमाणात काढून घ्यावे . 
२. इथे १ कप पिठास १ कप पाणी घ्यावे 
३. एका भांड्यात हे पाणी गरम करण्यास ठेवावे . 
४. पाण्याला उकळी आली की त्यात २ चमचे तेल टाकावे . 
५. मोजून घेतलेले तांदळाचे पीठ उकळत्या पाण्यात घालावे . 
६. जलद गतीने हलवून उकड एकजीव करावी . गॅसवरून उतरून ठेवावी  
७. झाकणी ठेवून १/२ मिनिट उकड भांड्यात ठेवावी .
८. ही उकड गरम असतानाच परातीत काढून घ्यावी . 
९. थंड पाण्याचा हात लावून भाकरीच्या पिठासाठी मऊ मळून घ्यावी . 
१०. साधारण १ वाटी पाणी थोडे थोडे घालून मऊपणा येईतोवर उकड मळून घ्यावी . 
११. उकडीचा चिकटपणा पूर्ण निघून जाईल आणि मऊ पिठाचा गोळा तयार होईल . 
१२. पीठ सरळ मळले नाही अन्यथा मळताना पाणी कमी वापरले तर भाकरी कडक होतात   

भाकरी थापण्याची पद्धत :


भाकरी भाजण्यासाठी तवा ती थापण्याआधीच गरम करत ठेवावा .

१. कोरड्या पळपाटावर , परातीत तांदळाचे कोरडे पीठ पसरून घ्यावे .
२. मळलेल्या पिठाचा दोन हातात गोल पुरवून मध्यम आकाराचा गोळा करावा .

   पिठाच्या गोळ्याला कुठेही चीर नसेल तरच पीठ चांगले मळले गेले असे समजा .
   गोळ्याला चीर असेल तर भाकरी थापताना मोडते .

३. हा गोळा परतीच्या , पळपाटाच्या मध्यभागी कोरड्या पिठावर ठेवावा .



४. उजव्या हाताने डावीकडून उजवीकडे गोळा फिरवत भाकरी थापावी .
५. भाकरीच्या कडांसहित ती सर्व बाजूनी पातळ थापावी .


भाकरी भाजण्याची पद्धत :


१. थापलेली भाकरी उजव्या हाताच्या बोटानी अलगद सरकवत डाव्या हाताच्या पंजावर घ्यावी 
२. डाव्या हातावरच्या भाकरीचा वरचा भाग खाली जाईल अशा पद्धतीने ती तापलेल्या तव्यात टाकावी .
भाकरीसाठी तवा पूर्ण तापलेलाच हवा अन्यथा भाकरी जास्त वेळ तव्यात राहते आणि कडक होते .  
३. साधारण १/२ मिनिटाने उजव्या हाताच्या बोटांनी तव्यातील भाकरीच्या वरच्या बाजूस  थंड पाणी पसरून घ्यावे 
४. भाकरीच्या कडा साधारण १/२ मिनिटात सुटायला सुरु होतात. 
५. कडा सुटल्या की हलक्या हाताने भाकरी पालटावी . 
६. भाकरीची पाणी लावून पलटलेले बाजू पूर्ण भाजली की भाकरी नुसत्या बोटाने तवाभर फिरू शकते . 
 तव्यात भाकरी न फिरत चिकटून राहिली असेल तर तिला अजून थोडा वेळ भाजावी .  
याला भाकरी नीट पचली असं म्हणतात . 
७. ही पचलेली भाकरी डाव्या चिमटीने तव्यातून वर उचलावी . 
८. तवा गॅसवरून बाजूला करावा . 
९. डाव्या हातातील भाकरी गॅसच्या ज्योतीवर पालथी करावी . 
१०. दर सेकदाला ज्योतीवरून हलवत सर्व बाजूनी भाजून घ्यावी .   
११. भाकरी जितकी  पातळ थापली असेल तितकी भाजताना लवकर फुगते. 
१२. जर घरी ज्योतीची शेगडी  नसेल , तुम्ही जर इलेकट्रीक शेगडी वापरात असाल तर शेवटच्या टप्प्यातील ज्योतीवर भाकरी भाजणे शक्य होत नाही . अशावेळी ती याच पद्धतीने तव्यात पालथी टाकावी . 
१३. वरच्या बाजूने रुमालाने हलकेच दाब देत गोल फिरवत भाजावी . 
१४. रुमालाने दाब दिल्याने ज्योतीशिवायही भाकरी फुगते .   

टीप :
१. पीठ सरळ मळले नाही अन्यथा मळताना पाणी कमी वापरले तर भाकरी कडक होतात

~ अमृता .. 

No comments:

Post a Comment

Popular Posts