परवा संध्याकाळी खूप भूक लागली आणि जिभेलाही काहीतरी चटपटीत हवं होत .
पटकन जाऊन कोल्हापूर ची राजाभाऊ भेळ खाऊ असा वाटायला लागलं . पण मी हा पल्ला गाठेतोवर कोल्हापूरकरांनी सकाळ उजाडली असती . :) आणि भडंगही अशी आणीवेळी संपलेली असते
मग काय .... घरी असलेल्या प्लेन कॉर्नफ्लेक्सची भेळ बनवली .छान जिभेचे चोचले पुरवेल अशी चटपटीत झाली .
साहित्य :
१ मोठा बाऊल कॉर्नफ्लेक्स (without honey)
१ कांदा बारीक चिरून
१/२ टोमॅटो बारीक चिरून
१/२ कप काकडी बारीक चिरून
कोथिंबीर बारीक चिरून
१/२ लिंबाचा रस
बारीक शेव
खारी बुंदी
१ वाटी भाजके शेंगदाणे सोलून
हिरवी चटणी (कृती खालील प्रमाणे)
खजूर चिंचेची गोड चटणी (ऐच्छिक ) कृतीसाठी इथे क्लिक करा .
चाट मसाला १ चमचा
मीठ , साखर चवीनुसार
हिरवी चटणी कृती :
१. ४ हिरव्या मिरच्या , २ लसूण पाकळ्या ,१/४ कप चिरलेला कांदा पॅनमध्ये १ चमचा तेलावर भाजून घ्या .
२. कोथिंबीर , मीठ आणि पॅनमधील भाजलेले साहित्य एकत्र करून मिक्सरमधून फिरवून बारीक करून घ्या .
३. ही चटणी मिक्सरमध्ये वाटताना पाणी वापरू नये .
कॉर्नफ्लेक्स भेळ ची कृती :
१. एका मोठ्या भांड्यात कॉर्नफ्लेक्स काढून घ्या .
२. त्यात चिरलेला कांदा , टोमॅटो,काकडी,कोथिंबीर , भाजके शेंगदाणे , खरी बुंदी, बारीक शेव घाला .
३. १/२ लिंबाचा रस , १ चमचा चाट मसाला , १ चमचा हिरवी चटणी, खजूर चिंचेची गोड चटणी घाला .
४. चवीनुसार मीठ आणि साखर घालून हलवून एकजीव करा .
५. सर्व्ह करताना वरून अजून थोडी शेव घाला .
टीप : यामध्ये खजूर चिंचेची गोड चटणी घातली तर भेळ आणखीन छान होते .
~ अमृता ..
No comments:
Post a Comment