बाहेर रिमझिमणारा पहिला वहिला गारांचा पाऊस ...
झाडांची टिपटिपणारी पानं , टपटप आवाज करत वाजणाऱ्या कौलारू घरांच्या खापऱ्या
सुवासिकतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडून हवेत विरघळून गेलेला ,
सगळीकडे दरवळणारा ओल्या मातीचा धुंदी चढायला लावणारा वास ...
आणि सोबतीला प्लेट भरून कांदा भजी ..
अहाहा .. कदाचित स्वर्गसुख काय ते हेच हो ..
अजून काय हवय आनंदी राहायला :)
चला तर मग ...... आजची स्पेशल .... कांदा भजी
याला खेकडा भजी असही म्हणतात हे मला पुणेकरांकडूनच कळलं :)
असो ......
सांगायला करू ना सुरुवात ?
साहित्य :
४ मोठे कांदे उभे पातळ चिरून
३/४ कप बेसन (चणा डाळीचे पीठ )
मीठ , हिंग
१ चमचा लाल मिरची पावडर ,
१/२ चमचा ओवा
भाजके जिरे किंवा जिरे पावडर
१/२ चमचा खायचा सोडा (ऐच्छिक )
१/२ चमचा हळद
तळण्यासाठी तेल
कृती :
१. कांदे सोलून मध्यभागी कापून अर्धे करून घ्या .
२. त्याचे उभे आणि अगदी पातळसे काप करून घ्या . चारी बाजूने वापरायची किसणी घरी असेल तर हे काम फारच सोपं होईल आणि सगळे काप पातळ आणि सामान आकाराचे होतील .
३. कापलेला कांदा हाताने कुसकरून घ्यावा म्हणजे पाकळ्या एकमेकांपासून विलग होतील .
४. त्यात मीठ , लाल तिखट , हळद, खायचा सोडा , १ चिमट हिंग , भाजके जिरे किंवा जिरे पावडर घालावे .
५. ओवा दोन्ही तळहाताच्या मध्ये चोळून घ्यावा अन मगच कांद्यात घालावा . त्यामुळे त्याचा जास्त वास येईल .
६. हे मिश्रण हलवून एकजीव करावे .
७. झाकली लावून १५ मिनिट ठेवून द्यावे .
८. १५ मिनिटांनी मिठामुळे कांद्याला चांगले पाणी सुटलेले दिसेल .
९. त्यात एक एक चमचा करत चणाडाळीचे पीठ घालून हलवत राहणे .
भजीचे पीठ भिजवण्यास पाणी वापरू नये
१०. हाताने मळून पीठ एकजीव करून घ्यावे .
११. भजीचे पीठ १० मिनिटे झाकून ठेवावे .
१२. तळण्यासाठी तेल तापत ठेवा . भाजी पूर्ण बुडतील इतपत तेल कढईत असावे . तळण्यासाठी नेहमीच खोलगट कढई वापरावी . कमी तेलात भजी पूर्ण बुडते .
१३. काढलेल्या तेलात हाताच्या चार बोटानी भजीचे पीठ तेलात सोडावे .
१४. मंद आचेवर भजी तळाव्या म्हणजे आतून कच्च्या रहात नाहीत . मोठ्या आचेवर तळल्यास आतून कच्च्या राहतात व बाहेरून पटकन करपतात.
१५ . भजी तळून झाल्यावर त्याच तेलात हिरव्या मिरच्या ही अखंड तळून घ्या . थंड झाल्यावर एकावर मिठामध्ये घोळवून घ्या .
१६ . गरम गरम भजी तळलेल्या मिरची सोबत आणि सुक्या खोबऱ्याच्या चटणीसोबत खायला मस्त लागते .
टीप :
१. कांदा अगदी पातळ कापावा . जाड कापल्यास तो भजीत कुरकुरीत लागत नाही .
२. कांदा एकजीव होण्या इतपतच बेसन घालावे . बेसन जितके कमी तितक्या भजी चांगल्या होतात .
३. पीठ भिजवण्यास अजिबात पाणी वापरू नये . भजी मऊ होतात . कांद्याला सुटलेल्या पाण्यातच हत्येने मळून पीठ भिजवावे .
४. बऱ्याच ठिकाणी भजीसोबत मिरच्या उकडून देतात . पण तळलेल्या मिरचीची चव उकडल्याहून छान लागले .
~ अमृता ..
No comments:
Post a Comment